महाराष्ट्र

राज ठाकरे : शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच एलर्जी

Rani Sahu
1 May 2022 3:50 PM GMT
राज ठाकरे : शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच एलर्जी
x
शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच एलर्जी आहे. शरद पवार (Sharad Pawar) प्रत्येकवेळी भाषणात बोलताना शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेतात. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहेच. पण त्याआधी महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे

मुंबई: शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच एलर्जी आहे. शरद पवार (Sharad Pawar) प्रत्येकवेळी भाषणात बोलताना शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेतात. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहेच. पण त्याआधी महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर हे शिवाजी महाराजांचाच विचार घेऊन पुढे गेले, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. ते रविवारी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केले. शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाहीत, हे मी सांगितल्यानंतर सगळे बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. आता मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली. मी जात मानत नाही. मला जातीशी देणेघेणे नाही. मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मी ठाण्यातील सभेत शरद पवार नास्तिक आहेत, असं बोललो तेव्हा ती गोष्ट त्यांना झोंबली. पण मला जे माहिती होते, तेच मी बोललो. माझ्या टीकेनंतर शरद पवार यांचे देवाला पाया पडतानाचे फोटो समोर आले. पण सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत माझे वडील नास्तिक असल्याचे सांगितले होते. यापेक्षा आणखी काय पुरावा हवा आहे, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
शरद पवार सांगतात की, मी दोन समाजात दुही माजवत आहे. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. पण तुम्ही जातीत आणि धर्मात भेद निर्माण करत आहात. शरद पवार मला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचण्याचा सल्ला देतात. पण माझ्या आजोबांची पुस्तकं वाचली आहेत. पवार साहेब तुम्ही त्या पुस्तकांमधील तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी वाचल्या आहेत. माझ्या आजोबांनी जे लिहलंय ते व्यक्तीसापेक्ष आणि परिस्थितीला धरून लिहले आहे. ते हिंदू धर्माला मानत होते. पण धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवायचे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.


Next Story