अग्रलेख : धर्मा तुझा रंग कसा?

रंग निसर्गाचे, ते काही मानवाला निर्माण करता येत नाहीत.. मग रंगावर एखाद्याच गटाने मालकीहक्क सांगून त्याच्या वापराबद्दल आक्षेप घेण्याचे राजकारण का करावे?

Update: 2022-12-17 14:07 GMT

फाइल फोटो 

जनता से रिश्ता वबेडेस्क | रंग निसर्गाचे, ते काही मानवाला निर्माण करता येत नाहीत.. मग रंगावर एखाद्याच गटाने मालकीहक्क सांगून त्याच्या वापराबद्दल आक्षेप घेण्याचे राजकारण का करावे?

आपल्या देशात भावना हे प्रकरण बहुधा सतत कुणाकडून तरी दुखावून घेण्यासाठीच जन्माला येत असावे. यावेळी ती जबाबदारी एका अर्धवस्त्राच्या म्हणजे बिकिनीच्या रंगाने घेतली आहे. पठाण हा एका प्रथितयश निर्मात्याचा आगामी चित्रपट. त्यातील बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने घातलेल्या काही अर्धवस्त्रांपैकी एकाचा रंग भगवा असल्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या आहेत म्हणे. असे काही झाले की आजच्या काळात पाळायचे सगळे रीतीरिवाज यथासांग पार पाडले जातात. त्यानुसारच सारे काही घडते आहे. म्हणजे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम दास यांनी हे गाणे सुधारले नाही तर त्यांच्या राज्यात हा सिनेमा प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असे जाहीर केले आहे. मग माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे या गाण्याच्या विरोधात वेगवेगळ्या लोकांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यानंतरचा पुढचा विधी म्हणजे समाज माध्यमांवरून बहिष्काराचा व समर्थनाचा 'ट्रेण्ड'. तोही सध्या जोरदार सुरू आहे. भावना दुखावल्या जाण्यास हल्ली जसे फार काही लागत नाही तसेच स्वत:ला हसवून घेण्यासाठी फार दूर कुठे कॉमेडी शोमध्ये किंवा स्टॅण्डअप कॉमेडियनकडे जाण्याची गरज पडत नाही. त्यानुसार भगव्यावर या पद्धतीने आक्षेप घेतला गेल्यावर बॉलिवूडमधल्या आजवरच्या कोणकोणत्या चित्रपटांमधल्या कोणकोणत्या गाण्यांमध्ये नायिकांनी याच रंगाचे कपडे परिधान करून नृत्ये केली आहेत याचे सचित्र संदर्भ समाजमाध्यमांमधून फिरत आहेत. अशा चित्रपटांची, दृश्यांची यादी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी कमी नाही हे विशेष. त्याबरोबरच भगव्या रंगाचे लंगोट लावून फिरणाऱ्या बाबाबुवांचीही छायाचित्रांचेही संदर्भ दिले जात आहेत. तेव्हा चालले ते आता का चालणार नाही या मुद्दय़ाबरोबरच बिकिनी चालत नसेल तर लंगोट कसा काय बुवा चालतो, हा समाजमाध्यमी युक्तिवाद बिनतोड ठरतो आहे.

Tags:    

Similar News

-->